जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 30 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करा
सोलापूर दि. 06 (प्रतिनिधी) : जिल्हयातील उत्कृ्ष्ट क्रीडा व खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी 30 डिसेंबर 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत असे, आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
या क्रिडा पुरस्कारासाठी सर्वेत्कृष्ट गुणवंत खेळाडू (पुरुष-1, महिला-1, दिव्यांग खेळाडू-1 ), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (01) असे पुरस्कार दिले जातात.सदर पुरस्कारासाठी दिनांक 01 जुलै ते 30 जून या कालावधीसाठी मागील खेळाडूसाठी पाच वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल तसेच क्रीडा मार्गदर्शकासाठी दहा वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल.
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे जिल्हयात किमान 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. क्रिडा मार्गदर्शक म्हणून 10 वर्ष क्रिडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्यांनी वयाची 35 वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत खेळांमध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहिजे.
क्रीडा मार्गदर्शकासाठी गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक अर्ज करण्यास पात्र राहतील. सांघिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरीष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य व जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक विहीत नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरित्या मुदतीत सादर करणे आवश्यक राहील.
क्रिडा पुरस्कारासाठी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे दि.30 डिसेंबर 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा असे, आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पवार यांनी केले आहे.