पंतप्रधान मोदी हुकूमशहा : शरद पवार यांची मोदींवर सडकून टीका
सोलापूर – ( प्रतिनिधी ) –
सामान्य माणसांच्या अधिकारांवर संकट येत आहेत. त्याकडे लक्ष देण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत. आतापर्यंत झालेल्या पंतप्रधानांचा आपण कारभार पाहिला आहे. परंतु ज्यांच्याकडे देशाचा विचार नाही, असे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत. देशातील लोकांमध्ये ते सातत्याने संघर्ष वाढवत आहेत .सर्वधर्म एकत्र ठेवण्याची जबाबदारी पंतप्रधानांची असते, परंतु नरेंद्र मोदी ते पाळताना दिसत नाहीत .शिवाय पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेला शब्द पाळीला नाही. सातत्याने ते फक्त विरोधकांना शिव्या देत आहेत. दहा वर्षात पंतप्रधान मोदींनीच काय केले ? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वां शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या प्रचारासाठी मोडनिंब येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी ,महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू,पी. व्ही. नरसिंहराव ,मनमोहन सिंह यांचे देशासाठी असलेले योगदान कधीही देश विसरू शकत नाही. परंतु पंतप्रधान मोदी यांनी मात्र देशाचा संपूर्ण कारभारच हुकूमशाही पद्धतीने चालवला आहे ,असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली केलेले भाषण शरद पवार यांनी मोबाईलवरून स्पीकरद्वारे सभेला ऐकवले. मोदी फक्त भाषण करतात, मात्र काहीच करत नाहीत, असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी बोलताना लगावला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, अभिजीत पाटील, साईनाथ अभंगराव, कमलताई व्यवहारे, यांच्यासह माढा तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते शिवाजी कांबळे ,संजय कोकाटे, बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटणेकर, भारत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.