political
मोदी ,राहुल गांधी ,शरद पवार ,योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे यांच्या सोलापुरात जाहीर सभा
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमधील महायुती व महाविकास आघाडी व मित्र पक्षातील उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन्ही पक्षातील राष्ट्रीय व राज्य पातळीवरील दिग्गज नेते सोलापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्या जाहीर सभांचे सुद्धा नियोजन करण्यात येत आहे.
महायुतीमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार ,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार ,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच एमआयएमच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. या सर्व नेत्यांच्या जाहीर सभांचे नियोजन त्या – त्या पक्षांच्या प्रमुखांकडून करण्यात येत आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ नोव्हेंबरला होम मैदानावर सभा होणार असून त्याची तयारी सुरू आहे .याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा बार्शी दौऱ्यावर येत आहेत. या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोलापूर शहराबरोबरच माळशिरस, पंढरपूर – मंगळवेढा आणि अक्कलकोट येथे सभा होणार आहेत. करमाळा ,बार्शी व सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असल्याने त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे .राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मोहोळ आणि माढ्यातील उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा होणार आहेत.१३ नोव्हेंबर रोजी एमआयएमचे नेते ओवेसी यांची सभा नियोजित आहे. इतर नेत्यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू असून त्यांच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.