political
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भाजपाला कमालीचे टेन्शन ! जिल्ह्यात तुतारी सुसाट
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी कस लागणार
सोलापूर – ( विनायक होटकर ) राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वत्र उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवारी देताना मोठा कस लागणार आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भाजपला कमालीचे टेन्शन आल्याचे चित्र दिसून येत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र डोळ्यासमोर दिसत असले तरी लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षणाचासुद्धा मोठा फटका भाजपाला बसण्याची दाट शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या खासदारांना धोबीपछाड देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपले दोन उमेदवार दिल्लीत पाठवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. भाजपाकडून विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्यांनी आपला नियमित प्रचार सुरू ठेवला आहे. तर महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा नव्या जुन्या नेत्यांमधील उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरविण्यात येत आहे.अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटालासुद्धा सांगोला आणि मोहोळ मतदारसंघात मोठे भगदाड पडले आहे. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तर याच गटाचे राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजितदादा यांना सोडचिठ्ठी देत शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडून लढलेले माजी मंत्री दिलीप सोपल माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच माजी आमदार दिलीप माने माजी आमदार प्रशांत परिचारक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवार गटाकडे गेलेल्या नेत्यांचा लोंढा पुन्हा शरद पवार गटाकडे येताना दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील एक राजकारणातील मोठे घराणे म्हणून ओळख असलेल्या मोहिते – पाटील परिवाराने आता भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या या राजकीय निर्णयाचा सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी माळशिरस, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला तसेच मोहोळ या विधानसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.एकूणच यंदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडी मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—————————– ——-
२०१९ मध्ये महायुतीचा झेंडा !
—————————— ——-
२०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी पाच जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली होती ( विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, शहाजीबापू पाटील ) .तर चार जागा महाआघाडीने ( प्रणिती शिंदे, यशवंत माने, स्वर्गीय भारत भालके आणि बबनदादा शिंदे )पटकावल्या होत्या. करमाळा आणि बार्शी या दोन जागा ( संजयमामा शिंदे आणि राजेंद्र राऊत )मिळवून अपक्षांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांना त्यांची जागा दाखवून दिली होती. सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख ,प्रणिती शिंदे, बबनदादा शिंदे, सचिन कल्याणशेट्टी ,स्वर्गीय भारत भालके ,शहाजी बापू पाटील, राम सातपुते, राजेंद्र राऊत, यशवंत माने आणि संजयमामा शिंदे यांनी विधानसभेत आपापल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापैकी पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात स्वर्गीय भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांचा पराभव करून भाजपाचे समाधान आवताडे निवडून आले होते.सध्या महायुतीकडे प्रणिती शिंदे वगळता १० आमदार आहेत. यातील काहीजण महाविकास आघाडीकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे सोलापुरात महायुतीवर मोठे संकट आले आहे.
—————————— —
२०१९ साल विधानसभानिहाय स्थिती
—————————— —-
सोलापूर शहर मध्य
—————————— —
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघामध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या आत्ताच्या विद्यमान खासदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी एमआयएमचे उमेदवार फारूख शाब्दी यांचा पराभव करत हॅट्रिक साधली होती. प्रणिती शिंदे यांना ५१ हजार ४४० तर शाब्दी यांना ३८ हजार ७२१ मते मिळाली होती.
—————————— —-
सोलापूर शहर उत्तर
—————————— —
सोलापूर शहर उत्तर मतदार संघामध्ये भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मोठे मताधिक्क घेऊन विजयी चौकार मारला होता. देशमुख यांना ९६ हजार ५२९ हजार तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांना २३ हजार ४६१ मते मिळाली होती.
—————————— –
दक्षिण सोलापूर
—————————— —
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला .त्यांनी काँग्रेस पक्षाचे बाबा मिस्त्री यांचा पराभव केला. देशमुख यांना ८७ हजार २२ तर बाबा मिस्त्री यांना ५७ हजार ९७६ मते मिळाली होती.
—————————–
अक्कलकोट
——————————
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रयत क्रांती कडून भाजपच्या कमळ चिन्हावर लढताना भाजपाचे सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला. कल्याणशेट्टी यांना १ लाख १९ हजार ४३७ मते पडली. पराभूत म्हेत्रे यांना ८२ हजार ६६८ मते मिळाली होती.
—————————— –
मोहोळ
——————————
मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचा पराभव केला होता. माने यांना ९० हजार ५३२ मते मिळाली. तर क्षीरसागर यांना ६८ हजार ८३३ मते मिळाली होती.
—————————— —-
पंढरपूर – मंगळवेढा
—————————— —-
पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वर्गीय भारत भालके यांनी हॅटट्रिक केली होती .त्यांनी रयत क्रांतीचे उमेदवार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव केला होता. भालके यांना ८९ हजार ७८७ तर परिचारक यांना ७६ हजार ४२६ आणि अपक्ष समाधान आवताडे यांना ५४ हजार १२४ मते मिळाली होती.मात्र भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला. समाधान आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५० आणि भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली.
—————————-
बार्शी
—————————-
बार्शी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार व माजी मंत्री दिलीप सोपल यांचा पराभव केला होता. राऊत यांना ९५ हजार ४८२ तर सोपल यांना ९२ हजार ४०६ मते मिळाली होती.
—————————— –
माळशिरस
—————————— —
माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघात राम सातपुते यांच्या रूपाने भाजपचा आमदार निवडून आला. सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम जानकर यांचा पराभव केला. सातपुते यांना १ लाख ३ हजार ७ तर जानकर यांना १ लाख ९१७ मते मिळाली होती.
—————————— —–
सांगोला
—————————— —–
सांगोला मतदार संघामधून शिवसेनेचे शहाजी बापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा थोडक्या मतांनी पराभव केला होता. पाटील यांना ९९ हजार ४६४ तर देशमुख यांना ९८ हजार ६९६ इतकी मते मिळाली होती.
—————————— —–
करमाळा
—————————— –
करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण आबा पाटील यांचा पराभव केला होता. शिंदे यांना ७८ हजार ८२२ तर पाटील यांना ७३ हजार ३२८ मध्ये मिळाली होती. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रश्मी बागल यांना ५३ हजार २९५ मते मिळाली, आणि त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या .
—————————— —
माढा
—————————— –
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे निवडून आले होते .त्यांना १ लाख ४२ हजार ५७३ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार संजय कोकाटे यांना ७४ हजार ३२८ मते मिळाली होती.
—————————— —