इंजिनिअरसह चौघांना अवैध पिस्तुल विक्री करताना अटक
सोलापूर, (प्रतिनिधी)ः- सोलापूर ग्रामीण परिसरात अवैधपणे पिस्तुल विक्री करणार्या चारजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी 6 पिस्तुल आणि 35 जिवंत काडतुसासह अटक करून 3 लाख 7 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. असल्याची माहिती पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अजित नवनाथ पाडोळे (वय 30, रा. शेवरे, ता. माढा,जि.सोलापूर), बिपिन तानाजी जाधव (वय 35, रा. रामोशी गल्ली टेंभुर्णी,ता.माढा,जि.सोलापूर),आकाश मधुकर चव्हाण (रा. आढेगांव, ता. माढा,जि.सोलापूर),कर्णवीर ऊर्फ अतुल गपाटे (रा. भिमानगर, ता. माढा,जि. सोलापूर)असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर यांनी त्यांच्या खबर्या मार्फत बातमी काढली की, सोलापूर पुणे मार्गावरील टेंभुर्णी येथील एका हॉटेलच्या परिसरात दोघेजण देशी बनावटीचे पिस्तुल घेवून विक्रीसाठी येणार आहेत. या माहिती वरून सहाय्यक फौजदार खाजा मुजावर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना ही माहिती सांगितली त्यावरून पथक तयार करून सापळा लावला असता दोघेजण संशयित आढळून आले त्यांची अंगझडती घेतली असताना त्यांच्याकडे देशी बनावटीचे दोन पिस्तुल आणि 9 जिवंत काडतुसे आढळून आले. त्यांच्या विरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडे कसून चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितले की काही दिवसापुर्वी एका साथीदारासह ऊस टोळी कामगार आणण्यासाठी धुळे जिल्ह्यात गेले असताना मध्यप्रदेशाच्या सीमेवरील उमर्टी गावात देशी बनावटीचे पिस्तुल कमी किंमतीत मिळत होते तेथून 6 पिस्तुल आणि जिवंत 35 काडतुसे विक्री करण्यासाठी खरेदी करून आणल्याचे त्यांनी कबुली दिली. त्यावरून त्यांच्या तिसर्या साथीदाराला अटक करण्यात आले आणि एक पिस्तुल विक्री केली होती त्यातील ग्राहकालाही अटक करण्यात आली त्या सर्वांकडून 6 पिस्तुल आणि 35 जिवंत काडतुसे असा एकूण 3 लाख 7 हजाराचा एैवज पोलीसांनी जप्त केला.ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, हवालदार गाडे, मोहन मनसावाले,गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, चालक शेख यांनी यशस्वीपणे बजावली.
आरोपी इंजिनिअर
या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अजित पाडोळे हा कनिष्ठ अभियंता म्हणून पंढरपूर विकास आराखड्यात कामाला होता. त्याला दारूचे आणि तमाशाचे व्यसन लागल्याने त्याने पिस्तुल विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. आरोपीची पत्नही इंजिनिअर असल्याचे समजले.