सामाजिक

लोकमंगलचा 15 डिसेंबर रोजी सामूहिक विवाह सोहळा

42 वर्षाची अखंड परंपरा

सोलापूर,(प्रतिनिधी):-
दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा यंदा 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजता गोरस मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. हा फौंडशनतर्फे होणारा 42 वा सामुदायिक विवाह सोहळा आहे, अशी माहिती लोकमंगल फौंडेशनच्यावतीने देण्यात आली.
विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल मल्टीस्टेट, आदी एकूण 125 पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी मंगळवार 10 डिसेंबर अंतिम तारीख आहे. या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विकास नगर येथील लोकमंगल फौंडेशनच्या ऑफीसला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वर्‍हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहेत. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. वधू- वरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत.
चौकट
आतापर्यंत 3089 जोडपी विवाहबद्ध
फौंडशनतर्फे होणारा 42 वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. आतापर्यंत 3089 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यामध्ये हिंदू 2382, बैद्ध 676, मुस्लिम 20, जैन 7 तर ख्रिश्‍चन समाजाचे 7 विवाह झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button