राज्यातील 800 पोलीसांना महासंचालकांकडून सन्मानचिन्ह जाहिर
सोलापूर,(प्रतिनिधी)ः-
पोलीस दलात विशेष आणि कौतुकास्पद कामगिरी करणारे वरिष्ठ अधिकार्यापासून ते पोलीस शिपायापर्यतच्या 800 पोलीसांना महासंचालकांकडून सन्मानचिन्ह जाहिर करण्यात आल्याचा आदेश राज्याच्या गृहविभागाकडून गुरूवार दि. 25 एप्रिल रोजी काढण्यात आला. यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या तत्कालीन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्त राजन माने, पोलीस आयुक्तांचे ऑपरेटर हेमंत वाघमारे यांनाही सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले.
1 मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने राज्यातील पोलीस दलातील विविध ठिकाणच्या पोलीसानी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि धाडसी कामगिरीची दखल आणि त्यांचे कौतुक म्हणून पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह/ बोधचिन्ह देण्यात येते. त्याचाच भाग म्हणून यंदाच्या वर्षी राज्यातील पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 800 पोलीसांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सन्मानचिन्ह जाहिर केले आहे.1 मे रोजी या सर्व पोलीस अधिकारी कर्मचार्यांना सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालकाकडून सांगण्यात आले. राज्यातील मुंबई ते गडचिरोली अशा सर्वच घटकातील 800 पोलीस अधिकारी कर्मचार्यांचा या मध्ये समावेश करण्यात आला आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या इतिहासातील पहिल्या महिला पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यात पदभार घेतल्यानंतर परिवर्तन नावाची योजना सुरू करून अनेकांना अवैध धंद्यापासून परावृत्त करून अनेकांचे संसार वाचवले. त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. त्याची दखल देशाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात येवून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा सन्मान करण्यात आला.
तसेच शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने,पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश किणगी, अल्फाज शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैय्यासाहेब थोरात, रामचंद्र मदभावी, लक्ष्मण खरात,पोलीस आयुक्तांचे ऑपरेटर हेमंत वाघमारे यांच्यासह पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, दिपक लोणकर, आणि सोलापूर ग्रामीणचे रोट्टे, राज्य राखीव दलाचे मोची यांचाही समावेश यामध्ये करण्यात आला आहे.