political

सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या विजयाची हॅटट्रिक रोखली ; तर माढा मतदारसंघात शरद पवारांची तुतारी चालली ! धैर्यशील मोहिते – पाटलांची बाजी !

सोलापूर  – देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. आई आणि वडिलांच्या झालेल्या पराभवाचा बदला घेत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचा मोठ्या मतांच्या फरकाने दारुण पराभव करत भाजपची हॅटट्रिक रोखण्यात यश मिळविले आहे .तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी वैयक्तिक लक्ष घातलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला सोडचिठ्ठी देऊन चॅलेंज स्वीकारत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेले धैर्यशील मोहिते – पाटील यांनी विद्यमान भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांना पराभवाची धूळ चारली. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये लागलेल्या धक्कादायक निकालामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भाजपची पीछेहाट झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लागण्यापूर्वीच तीन महिने अगोदर प्रचाराला सुरुवात करून ग्रामीण भाग तसेच शहरी भाग पिंजून काढला होता. दोन वेळा सुशीलकुमार शिंदे यांचा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली होती. तर भाजपाकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर न झाल्यामुळे आणि ऐनवेळी माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरात उमेदवारी दिल्यामुळे निवडणुकीचे वारे त्याचवेळी फिरले होते. उपरा उमेदवार सोलापूर लोकसभेसाठी लादल्यामुळे सोलापूरकर जनता त्याच वेळी संतापलेली होती. एकीकडे या लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारांची ताकद असताना देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांचा केलेला पराभव हा सर्वांनाच धक्का देणारा ठरला आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना शरद बनसोडे आणि जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते .

तर यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांचा सुभाष देशमुख यांनी पराभव केला होता. शिंदे घराण्यामध्ये पराभवाचीच मालिका सुरू होती .परंतु सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टर्म काँग्रेस पक्षाच्या आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देत काँग्रेस पक्षाने विजय खेळी खेळण्यात यश मिळविले. मंगळवारी झालेल्या मतमोजणीमध्ये प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा सुमारे ६० हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करत भाजपचा गड उध्वस्त केला. दरम्यान शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करत त्यांना धूळ चारली. माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ऐवजी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबीयांकडून भाजप श्रेष्ठींकडे आग्रह धरण्यात आला होता. परंतु मोहिते पाटील परिवाराचे भाजपने मनावर घेतले नाही. आणि विद्यमान खासदार निंबाळकर यांनाच दुसऱ्यांदा उमेदवारी दिली, आणि इथेच भाजपाला धक्का बसायला सुरुवात झाली. या मतदारसंघात शरद पवार यांनी वैयक्तिक लक्ष घातले आणि महाविकास आघाडी शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटलांच्या गळ्यात उमेदवारी माळ टाकली. आणि तेथूनच खऱ्या अर्थाने राजकीय गणिते सुरू झाली. मोहिते पाटलांनी माघार घ्यावी याबाबत महायूतीच्या अनेक मंत्र्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु मोहिते पाटलांनी ऐकले नाही. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली. याशिवाय माळशिरसचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांना सुद्धा आपल्या सोबत घेत त्यांच्या धनगर समाजाच्या एकगट्टा मताचा फायदा उचलत जानकर यांना विधानसभा निवडणुकीत निवडून आणण्याचा शब्द दिला होता.जानकर यांची मोहिते पाटलांना मोठी मदत झाली होती. या मतदारसंघात निंबाळकर यांच्या उमेदवारीला टोकाचा विरोध होता.असे असतानासुद्धा निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील समर्थक कमालीचे संतापले होते. याशिवाय मराठा आरक्षणाचा ही मोठा फटका माढा विधानसभा मतदारसंघात बसला. मोहिते पाटलांनी ही निवडणूक अत्यंत शांत आणि संयमाने लढवली आणि विजयाचा गुलाल उधळला. माढा मतदारसंघात सर्वच विधानसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button