सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवघड आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
सोलापूर , (प्रतिनिधी):-
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे एका 61 वर्षीय पुरुष रुग्णावर अवघड आणि दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय रुग्णालय म्हणटले की, सर्वसाधारण दर्जेची रुग्णसेवा व उपचार नजरेसमोर उभे राहतात परंतु श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापुर या शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची रुग्णसेवा व अत्याधुनिक उपचार दिले जात आहेत. सर्वसाधारण आजारासोबतच अतिशय दुर्विळ अशा आजारावरसुद्धा अत्याधुनिक उपचार केले जातात.
नुकतेच अधिवृक्क ग्रंथीची गाठ (अॅड्रेनल ग्लैंड ट्युमर) या अतिशय दुर्मिळ आजारावर श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापुर येथे दुर्बिणीव्दारे शस्रक्रिया करण्यात आली. ६१ वर्षीय पुरुष रुग्णावर ही शस्रक्रिया करण्यात आली. अॅड्रेनल ग्लैंड ट्युमर हा आजार अतिशय दुर्मिळ म्हणजेच १० लाखात २ ते ८ व्यक्तींना होतो. या ग्रंथितुन विविध संप्रेरके स्त्रवली जातात यामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढतो व डोके दुखणे, चक्कर येणे, मळमळणे, छातीत धडधड करणे अशी लक्षणे दिसुन येतात. याशिवाय गाठिमुळे पोटदुखी व अशक्तपणा येणे ही लक्षणे दिसुन येतान. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्यामुळे नियमित शस्त्रक्रिया करणे हे आव्हात्मक असते. यातुन अत्याधुनिक दुर्बिणीव्दारे या शस्त्रक्रिया करणे हे जास्तच आव्हानात्मक असते. श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापुर येथे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर, डॉ. संचित खरे, डॉ. अमेय ठाकुर व डॉ.अलिशा माथुर यांनी रुग्णावर दुर्बिणीव्दारे यशस्वीरित्या शस्रक्रिया केली. तर डॉ. निलांबरी अडके, डॉ. मंजरी देशपांडे, डॉ. सागर पारगुंडे यांनी भुलतज्ञ म्हणुन काम पाहिले. सागर भोसकर व विल्लयम गायकवाड यांनी सहायक म्हणुन काम केले. रुग्णांची प्रकृती उत्तम असुन त्याचा त्रास कमी झाला आहे.
या व अशा अनेक प्रकारच्या विविध अत्याधुनिक शस्त्रक्रिया व उच्च दर्जाचे उपचार हे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापुर येथे मोफत दिले जातात. याचाच एक भाग म्हणुन दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी व्हेरीकोज व्हेन अर्थात पायावरील फुगलेल्या शिरा या आजारावरती अत्याधुनिक लेझर पध्दतीने उपचाराचे शिबीर आयोजित केले आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफ शिबीराचा लाभ घ्यावा. दिनांक १५ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ओपीडी क्र. २७ येथे सकाळी ०९.०० ते १२.३० या वेळेत रुग्णांनी पुर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे असे रुग्णालय प्रशासन यांनी आवाहन केले आहे.