सोलापूर,(प्रतिनिधी):-
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या वतीने मे महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी, आणि इतर असे एकूण 70 गुन्हे दाखल झालेले होते त्यामध्ये 32 लाख 46 हजार 903 रूपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यापैेकी 66 गुन्हे उघड करून 43 लाख 26 हजार 973 रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. मे महिन्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी कर्नाटकातून येवून सोलापूर शहरात रविवारी दिवसा चोरी करणार्या सराईत गुन्हेगार शाहु ऊर्फ शरणप्पा सिध्दप्पा काळे (वय 36) याला अटक करून घर फोडीचे 4 गुन्हे उघड केले आणि 2 लाख 58 हजार 500 रूपयाचा ऐवज जप्त केला. तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण येथून येवून घरफोडी करणारा सॅमसन रूबीन डॅनियल (वय 25) याला अटक करून विजापूर नाका पोलीसांनी एकूण 5 घरफोडीचे गुन्हे उघड केले, शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी बुरखा घालून सराफ दुकानात चोरी करणार्या चार महिलांना अटक करून 4 गुन्हे उघडकीस आणले. तर उत्तर तहसिल कार्यालयातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर आणि 2 ट्रॉली असा 7 लाखाचा मुद्देमाल जप्त करून 4 चोरट्यांना अटक केले. अशा प्रकारे शहर पोलीसांनी मे महिन्यात चांगली कामगिरी केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली यावेळी पोलीस उपायुक्त अजित बोराडे, दिपाली काळे, पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, शिवाजी राऊत, पोलीस उपनिरीक्षक भंडारे आदी उपस्थित होते.