लहू मोटे खून प्रकरणी पुतण्याचा जामीन फेटाळला
सोलापूर –
वाळूज, तालुका मोहोळ येथील रामेश्वर निवृत्ती मोठे वय-25 वर्षे, धंदा- शेती, रा. वाळूज, ता. मोहोळ, जि. सोलापूर याने व त्याचे साथीदारांनी मिळून चुलता लहु मोटे याचा खून केल्याप्रकरणीच्या गुन्ह्याकामी त्याचा जामीन अर्ज मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. योगेश राणे साहेब यांनी फेटाळला.
यात हकीकत अशी की,
आरोपी रामेश्वर मोटे हा मयत लहू मोटे यांचा पुतण्या असून तो वाळूज येथील अतुल गुंड यांची शेती बटाईने करीत होता, परंतु लहू मोटे यांचे सांगण्यामुळे शेतीमालकाने सदरची शेती रामेश्वर मोटे याचेकडून काढून घेऊन त्रयस्त व्यक्तीस बटाईने करण्याकरिता दिली, त्यास कारण लहू मोटे असल्याचा संशय घेऊन घटनेच्या एक वर्षांपूर्वी आरोपी रामेश्वर मोटे याने लहू मोटे यास शिवीगाळ केली व तो लहू मोटे याचेवर चिडून होता, दि.09/06/2023 रोजी रात्री 10.00 चे सुमारास लहू मोटे व फिर्यादी किशोर मोटे हे दोघे शेतातील वस्तीवर झोपले असताना रात्री 2.00 वाजण्याच्या सुमारास आरोपी रामेश्वर मोटे व त्याचे इतर दोन साथीदारांनी काठीने व लोखंडी गजाने लहू मोटे व फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला. लहू मोटे यास झालेल्या जबर मारहाणीमुळे जवळपास 15 ते 20 दिवस त्यांच्यावर दवाखान्यात उपचार चालू होते. सदर घटनेची फिर्याद किशोर कुबेर मोटे याने मोहोळ पोलिसात दिली. त्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान लहू मोटे यांचे निधन झाले व त्यानंतर खुनाचे कलम वाढवण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रामेश्वर मोटे यास अटक करण्यात आली होती. तदनंतर आरोपीने जामीन मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या जामीन अर्जास फिर्यादीने ॲड. प्रशांत नवगिरे यांचे मार्फत हरकत घेतली, फिर्यादी तर्फे प्रतिज्ञापत्र दाखल केले, तसेच केस माघारी घेण्याबाबत आरोपीकडून फिर्यादीवर टाकण्यात आलेला दबाव याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. मूळ फिर्यादीच्या वकिलांचा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन मा.सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
यात मुळ फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक, ॲड. सिद्धाराम पाटील, सरकारतर्फे ॲड. माधुरी देशपांडे तर आरोपी तर्फे ॲड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.