मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या सरकारला विधानसभा निवडणुकीतच ताकद दाखविण्याची गरज ; सोलापुरातील शांतता रॅलीमधून मनोज जरांगे – पाटील यांचे समाज बांधवांना आवाहन !
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने आपली ताकद दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठा समाजाने आता आपल्या हक्काची लढाई आणखी तीव्र केली पाहिजे, असे आवाहन मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे – पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीची सुरुवात बुधवारपासून सोलापुरातून झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले .तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर ,राज ठाकरे तसेच नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्यावरही जरांगे पाटील यांनी तोंडसुख घेतले. हे राजकारणातील मराठा समाजाचे विरोधक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचा जो कोणी उमेदवार असेल त्यालाच मराठा समाजाने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. भाजपच्या लोकांनी एकाचे तीन क्रांती मोर्चे केले आहेत. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये .आता मराठा समाजाच्या समन्वयकांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काहीजण सत्तेसाठी पावसात भिजतात ,आपण जातीसाठी पावसात भिजू ,असे सांगत जरांगे पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली. ७० हजार कोटींचा घोटाळा करणारे सत्तेत असल्याचे सांगत नाव न घेता जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनाही टार्गेट केले. भुजबळ हे बोगस समितीचे देशाचे अध्यक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नितेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली .मराठा समाज संयमी असल्यामुळेच आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलन टिकून राहिले आहे. मराठा समाजाने धीर धरावा. शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
———————————–
महापुरुषांना अभिवादन !
————————————
मनोज जरांगे – पाटील यांचे बुधवारी दुपारी तुळजापूर येथून सोलापुरात आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ते पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात पोहोचले. या ठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचा क्रेनद्वारे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर शांतता रॅलीला सुरुवात झाली. तासभराच्या अंतरानंतर जरांगे – पाटील यांची रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर मनोज जरांगे – पाटील यांचा क्रेनद्वारे भलामोठा पुष्पहार घालून यथोचित सन्मान करण्यात आला. एक मराठा लाख मराठा ,आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून दुपारी साधारण चार वाजता मनोज जरांगे – पाटील यांनी मराठा आरक्षण विषयावर जनसमुदायाला संबोधित केले. एक मराठा लाख मराठा,आम्ही सर्व जरांगे पाटील तसेच त्यांचे फोटो असलेले टी-शर्ट, गळ्यातील उपरणे तसेच डोक्यावरील भगवी टोपी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. लहान मुलांना पालकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या वेशभूषेत सजवून आणले होते. संपूर्ण सोलापूर शहर जरांगेमय झाल्याचे दिसून आले.